प्रत्येक भावा-बहिणीला ज्या गोष्टीचा प्रतिक्षा लागलेली असते तो रक्षाबंधन सण जवळ आलाय. रक्षाबंधंनाच्या उत्सवाची रेलचेल सध्या बाजारात सगळीकडे नजर टाकली तरी दिसते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला बहीण आपल्या भावांकडून राखी बांधून सुरक्षेचं वचन घेते. तर दुसरीकडे भाऊ आपल्या बहीणीला तन, मन, धनाने रक्षेचं वचन देतात.
कधी साजरा केला जातो रक्षाबंधन?
हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येकवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. यावेळी रविवारी २६ ऑगस्टला रक्षाबंधन केलं जाणार आहे.
काय आहे आख्यायिका?
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
राखी बांधण्याचा मुहूर्त
सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत(26 ऑगस्ट)
पौर्णिमा तिथी सुरुवात : दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी (२५ ऑगस्ट)
पौर्णिमा तिथी समाप्त : सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी (२६ ऑगस्ट)
राखी बांधण्याची पूजा-विधी
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला तिचं रक्षा करण्याचं वचन देतो.
- सर्वातआधी राखीचं ताट सजवा. त्यात थोडं कुंकू, अक्षत, तांदूळ, दिवा आणि राखी ठेवा.- त्यानंतर भावाला टिळा लावून त्याच्या उजव्या हातावर रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधावी. - राखी बांधल्यानंतर भावाची आरती करावी. - त्यानंतर त्याला मिठाई खाऊ घाला. - जर भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असेल तर त्याच्या पाया पडा. - जर बहीण मोठी असेल तर भावाने पाया पडावे.- राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणीला भेटवस्तू दयावी.