रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. त्यानंतर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण त्याआधीच लखनौमधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय फुटबॉलपटू अंशिकाने रक्षाबंधनाच्या काही दिवस आधी तिचे लिव्हर दान करून भावाचा जीव वाचवला आहे. आपले संपूर्ण करिअर पणाला लावून या बहिणीने आपल्या भावाचा जीव वाचवला. अंशिकाने सांगितले की, तिने महाराष्ट्र, कानपूर आणि यूपी संघासोबत राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा फुटबॉल सामने खेळले आहेत आणि ट्रॉफी जिंकली आहे.
अंशिकाच्या म्हणण्यानुसार, सर्व काही ठीक चालले होते. याच दरम्यान, वडील कमलेश यांना हृदयासंबंधित आजार झाला. हृदयविकारामुळे ते घरीच राहू लागले, तर आई लीलावती गृहिणी आहेत. पंजाबमध्ये तिचं लग्न झालं आहे पण तिने खेळणं कधीच सोडले नाही. ती फुटबॉल खेळत राहिली. अंशिकाचा भाऊ शैलेंद्र याला क्रिप्टोजेनिक सिरोसिस (Cryptogenic Cirrhosis) या गंभीर लिव्हरसंबंधीत आजाराचे निदान झाले
डॉक्टरांनी तपासणीनंतर लिव्हर ट्रान्सप्लान्ट हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत बहीण प्रतिभा हिचा ब्लड ग्रुप जुळत नव्हता. त्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याचा ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता, पण अंशिकाचा ब्ल़ड ग्रुप तिच्या भावाच्या ब्लड ग्रुपशी जुळला. यानंतर भाऊ आणि बहीण या दोघांना 21 जून रोजी लखनौ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 22 जून रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
28 वर्षीय अंशिकाने सांगितले की, डॉक्टरांनी तिला तीन महिने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. अंशिकाच्या म्हणण्यानुसार तिने हळूहळू सराव सुरू केला आहे. लखनौमध्ये मुलांना फुटबॉल शिकवणारे खुर्शीद अहमद म्हणतात की, डॉक्टरांनी तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फुटबॉलच्या मैदानावर यायला सांगितले आहे, पण फुटबॉल हा अतिशय व्यस्त आणि मेहनतीचा खेळ आहे, अशा परिस्थितीत किमान यायला एक वर्ष लागेल. अंशिकाला चार महिन्यांची मुलगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.