हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहीण भावाला राखी बांधणार होती. मात्र याच दरम्यान ती अपघाताची बळी ठरली. कर्नालमध्ये एका ट्रकने दाम्पत्याला चिरडलं. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्यावर पाणी असल्याने आणि खड्ड्याचा अंदाज न आल्याने बाईकवरून जाणारं दाम्पत्य खाली पडलं. याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडलं. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
कर्नालमधील इंद्री येथील बुधाखेडा गावात राहणारा जसविंदर सिंह पत्नी रीटा हिला बाईकवर घेऊन आधी तरवाडी येथे बहिणीकडे जात होता. त्यानंतर तो पत्नीला माहेरी सोडणार होता. जीटी रोड तरवडीवरील टी-पॉइंटजवळील सर्व्हिस लेनजवळ हे आले असता हा अपघात झाला. या अपघातात जसविंदरही गंभीर जखमी झाला आहे. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी जसविंदरला कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं आणि रीटाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. घटनास्थळी उभा असलेला ट्रक तरवडी पोलिसांनी ताब्यात घेतला. रीटाच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबातील रक्षाबंधनाच्या आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.