जयपूर - देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला. कोरोनाच्या सावटातही यंदा सण साजरा करता आल्याने राखी पौर्णिमेचा उत्साह सर्वत्र दिसून आला. लाडक्या बहिणींसाठी बाजारात खरेदी करणारे भाऊ, तर भावाच्या हातावर बांधण्यासाठी ऱाखी घ्यायला आलेल्या बहिणींनी बाजारपेठाही फुलल्या होत्या. देशभरात बहिणी भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला राखी पौर्णिमेचा उत्साह दिसून आला. मात्र, बीएसएफमधील आपल्या भावाच्या अस्थीकलाशाला राखी बांधतानाचा एका वीर बहिणीच्या फोटोने देश हळहळला.
राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेले चिरंजीलाल यांचे स्वातंत्र्य दिनी निधन झाले. ह्रदयविकाराच तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार चीता थंड करण्यासाठी त्रिपादुका अन् अस्थीकलश ठेवण्यात आला होता. चिरंजीलाल यांच्या बहिणीने या अस्थीकलशालाच राखी बांधली.
लक्ष्मी असं या बहिणीचं नाव असून गेल्या 4 वर्षांपासून त्यांना भावाला राखी बांधता आली नवह्ती. सन 2017 मध्ये त्यांनी यापूर्वी राखी बांधली होती. विशेष म्हणजे 13 ऑगस्ट रोजी भाऊ बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी, यंदा मी राखी बांधायला घरी येणार, असे त्यांनी लक्ष्मी यांना सांगितले. मात्र, 15 ऑगस्ट रोजी दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे, भावाचे ते शब्द आजही कानात ऐकू येत असल्याचं सांगत, आपण अस्थीकलशाला राखी बांधली, असे लक्ष्मी यांनी म्हटलं आहे. बहिणी भावाच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, देशभरातून सोशल मीडियात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.