मुंबई : रक्षाबंधन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. बहीण भावाला राखी बांधते व त्याला दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला सुरक्षेचं वचन देतो. पण या उत्सवाचं महत्त्व काय आहे? याची सुरुवात कशी झाली? हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊन रक्षाबंधनाचं महत्त्व...
कधी केला जातो साजरा?
हिंदू पंचांगप्रमाणे श्रावण महिन्यात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
कुठे असाही साजरा होतो हा उत्सव
काही भागांमध्ये नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो.
काय आहे महत्त्व?
पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला जात-धर्म-पंथाला छेद देत इतिहासही साक्षी आहे. हे संदर्भ लक्षात घेऊन "राखी' बांधली तर बांधून घेणारा आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.
आख्यायिका
रक्षाबंधन या उत्सवाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.