अहमदाबाद - संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनासोबत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. एकीकडे देश स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करतोय तर दुसरीकडे बहिणी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतायेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी पाकिस्तानची बहीण कमर मोहसिन शेख दिल्लीत पोहचल्या आहेत. मोहसिन शेख 24 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतायेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत होते तेव्हा त्यांची ही बहिण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत होती.
कमर मोहसिन शेख यांनी याबाबत सांगितले की, मला दरवर्षी मोठे भाऊ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्याची संधी मिळते. मी खूप आनंदात आहे. मी प्रार्थना करते की, पुढील 5 वर्षही त्यांच्या चांगल्या कामामुळे जगभरात त्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हावी. तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीही मी प्रार्थना करते.
24 वर्षापासून बांधत आहे राखीमागील 24 वर्षापासून कमर मोहसिन शेख या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधत आहेत. सध्या मोहसिन शेख यांचे कुटुंब अहमदाबाद येथे वास्तव्य करत आहे. काही काळापूर्वी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमधील कराची सोडून अहमदाबादमध्ये येऊन राहू लागलं. कमर मोहसिन शेख ही पंतप्रधानांची मानलेली बहिण आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी भाजपाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाचं काम करत होते तेव्हापासून ही बहिण त्यांना राखी बांधते. पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांचे बहिणीवर विशेष प्रेम आहे. प्रत्येक वर्षी ती दिल्लीला येऊन प्रथा-परंपरेनुसार नरेंद्र मोदींना राखी बांधते आणि त्यांना ओवाळते.