ऑनलाइन टीम
लखनौ, दि. १२ - उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे सत्र अद्याप सुरूच असून जनतेच्या रक्षणाची जबाबादारी असणा-या पोलिसांनीच एका महिलेवर पोलीस स्टेशनच्या आवारात बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलिस स्टेशनमध्ये चार पोलिस कर्मचा-यांनीच महिलेवर बलात्कार केला. एका गुन्ह्यात कैद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पीडित महिला तुरूंगात गेली असता बंदूकीचा धाक दाखवत पोलिस ठाण्याच्या प्रमुखांसह चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने हमीरपूरचे पोलिस अधिक्षक वीरेंद्र शेखर यांच्याकडे जाऊन झाला प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. तर, अन्य तीन कर्मचा-यांचा शोध घेण्यात येत आहे
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात नुकतेच दोन मुलींवर बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडावर लटकवल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. तर बुधवारी बहारीच येथे एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला झाडावर लटकवण्यात आले होते.
मुरादाबादमध्ये १६ वर्षीय मुलीची झाडावर लटकवून हत्या
मुरादाबाद येथे एका मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले असून तिचा मृतदेह झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. काल संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता झाली होती.