सहाव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी हरियाणात सभा, रोड शोंचा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:43 AM2019-05-05T06:43:03+5:302019-05-05T06:43:29+5:30
१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शोंचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
- बलवंत तक्षक
चंदीगड - १२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शोंचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
अमित शहा हे ५ मे रोजी सोनिपत, करनाल आणि अंबाला या तीन मतदारसंघांत सभा घेणार आहेत. त्यानंतर ते भिवानी-महेंद्रगढमधील दादरी आणि हिस्सार भागात सभा घेतील. १0 मे रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरसा आणि रोहतक येथे दोन सभा घेणार आहेत. सोनिपत आणि रोहतक येथून पिता-पुत्र भूपेंद्रसिंग हुडा आणि दीपेंद्रसिंग हुडा यांना रोखण्यासाठी मोदी-शहा जोडी सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहे.
राहुल गांधी हे ६ मे रोजी भिवानी-महेंद्रगढ क्षेत्रात सभा घेणार आहेत. ९ मे रोजी ते रोहतकमध्ये सभा घेणार आहेत. प्रियांका गांधी ७ मे रोजी अंबाला आणि हिस्सारमध्ये सभा घेणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी त्या रोहतकमध्ये ५ कि.मी. लांबीचा रोड शो करणार आहेत.
हरियाणातील भाजपाची सूत्रे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हाती आहेत. राज्यातील सर्व १0 जागा भाजपाला मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांनी चकित करणारे निकाल लागतील, असे म्हटले आहे.
सात जागा राखण्याचे आव्हान
गेल्या वेळी मोदी लाटेत १0 पैकी ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. इंडियन नॅशनल लोकदलाला २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली होती. यंदा दुष्यंत चौटाला यांनी लोकदलापासून दूर होऊन जननायक जनता पार्टीची स्थापना केली आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.