श्रीनगर : फुटीरवाद्यांच्या प्रस्तावित रॅलीच्या दृष्टिकोनातून काश्मिरातील अनेक भागांत शुक्रवारी संचारबंदी लागू करण्यात आली. पुलवामा जिल्ह्यात दगडफेक करणाऱ्यांना आवरण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एक युवक ठार झाला. गेल्या महिन्यात हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यापासून खोऱ्यात हिंसाचार सुरू असून, सलग ४९ व्या दिवशीही संचारबंदी लागू असल्यामुळे सामान्य जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. संपूर्ण श्रीनगर, पुलवामा जिल्हा आणि दक्षिण काश्मिरातील शोपिया, अनंतनाग शहरांतही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर काश्मिरातील बारामुला, पत्तन आणि हंदवाड्यातही संचारबंदी लागू असून, उर्वरित भागांत लोकांना एका ठिकाणी गोळा होण्यास बंदी आहे. फुटीरवाद्यांनी शुक्रवारच्या नमाजनंतर जुन्या शहर भागातील इदगाह मैदानापर्यंत रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली उधळून लावण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीची व्याप्ती वाढविली. खोऱ्यात सलग ४९ दिवसांपासून सुरू असलेली संचारबंदी, जमावबंदी आणि फुटीरवाद्यांच्या बंदमुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुकाने, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि पेट्रोल पंप बंद असून, सार्वजनिक वाहने रस्त्यावरून गायब आहेत. संपूर्ण खोऱ्यातील मोबाईल सेवाही बंद आहे. वाणीच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांतील लोकांच्या मृत्यूबाबत फुटीरवादी खोऱ्यात आंदोलन करीत आहेत. त्यांनी खोऱ्यात १ सप्टेंबरपर्यंत बंदचे आवाहन केले आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत आज एक युवक मृत्युमुखी पडल्यामुळे हिंसाचारातील बळींचा संख्या वाढून ६७ झाली आहे. (वृत्तसंस्था)>गिलानींना अटकप्रशासनाने दोन प्रमुख नेत्यांना अटक करून श्रीनगरमध्ये रॅली काढण्याचा त्यांचा प्रयत्न उधळून लावला. फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवैझ उमर फारुक यांनी रॅलीसाठी आपल्या निवासस्थानाबाहेर पडण्याचा प्रयत्न करताच त्यांना अटक करण्यात आली. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
भडक्यापूर्वीच रॅली उधळली
By admin | Published: August 27, 2016 6:04 AM