त्रियुग नारायण तिवारी अयोध्या : राममंदिराच्या बांधकामाला वेग देते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने मंदिराचा नकाशा मंजुरीसाठी अयोध्या फैजाबाद विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे.
नकाशाला मंजुरी घेण्यासोबत अनेक विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही घ्यावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च येईल. मंदिराच्या बांधकामात अडसर निर्माण करणारा राम चबुतरा तोडला जात आहे. हाच राम चबुतरा राममंदिर आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. आता हा चबुतरा इतिहास जमा होणार आहे. रामजन्मभूमीचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने ज्या ठिकाणी शिलान्यास केला होता, त्या जागेजवळच चबुतरा (ओटा, पार) होता. हा चबुतरा अद्याप तुटलेला नाही. मंदिराच्या प्रतिकृतीच्या मधोमधच चबुतरा येत असल्याने तो तोडणे जरुरी आहे. तोवर नकाशानुसार काम सुरू होणार नाही. मानस भवनही तोडण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, नकाशा मंजूर झाल्यानंतरच काम सुरू होईल.येथील माती परीक्षणासाठी आयआयटी चेन्नईकडे पाठविण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच पाया किती खोल असेल, काम कधी सुरू होईल, हे ठरविले जाईल. कोरीव शिलांचा वापर कसा करायचा, हे एल अॅण्ड टी कंपनी ठरविणार असून कंपनी लवकरच येथे कार्यालय सुरू करणार आहे.