कर्नाटक निवडणुकीत आले ‘राम, हनुमान’; बजरंग दलावर कारवाई करण्याचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:28 AM2023-05-03T08:28:11+5:302023-05-03T08:28:48+5:30
काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरून भाजप आक्रमक; काँग्रेसचा पाच योजनांचा पुनरुच्चार
होस्पेट (कर्नाटक) : काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हनुमानाची पूजा करणाऱ्यांना बंदिस्त करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने आधी भगवान रामाला कोंडून ठेवले होते आणि आता ‘जय बजरंग बली’ म्हणणाऱ्यांना बंद करायचे आहे. विजयनगर जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, मी हनुमानाच्या भूमीवर आलो आहे. मी भाग्यवान आहे की, मला हनुमानाच्या भूमीला वंदन करण्याची संधी मिळाली; पण दुर्दैव बघा की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्यांना बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देशाचे दुर्दैव आहे की काँग्रेसला भगवान रामाची अडचण होती आणि आता ‘जय बजरंग बली’ म्हणणाऱ्यांची अडचण झाली आहे. भाजप कर्नाटकच्या सन्मान आणि संस्कृतीला कधीही धक्का लागू देणार नाही, असेही ते म्हणाले.
निवडणुकीचा स्तर घसरू देऊ नका : आयोग
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा खालावलेला दर्जा पाहता निवडणुकीचा स्तर घसरू देऊ नका, अशी सूचना निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, तसेच त्यांच्या स्टार प्रचारकांना केली. विशेष म्हणजे स्टार प्रचारकांकडून प्रचारादरम्यान अनुचित शब्द आणि भाषेचा वापर करण्यावरून आयोगाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
समाजात द्वेष पसरविणाऱ्या बजरंग दलावर कारवाई करणार
जाती आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सारख्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहे, असा शब्द काँग्रेसने कर्नाटकात आपल्या जाहीरनाम्यात दिला आहे.
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यानंतर एका वर्षाच्या आत भाजप सरकारने केलेले सर्व अन्यायकारक कायदे आणि लोकविरोधी कायदे रद्द करण्याचे आश्वासनही यात देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यात म्हटले की, कायदा आणि संविधानाला आम्ही पवित्र मानतो. बजरंग दल, पीएफआय अथवा कोणी व्यक्ती किंवा द्वेष पसरविणाऱ्या संघटना भले त्या बहुसंख्य वा अल्पसंख्याकांमधील असतील त्यांना संविधानाचे उल्लंघन करू देणार नाही. अशा संघटनांवर बंदी घालण्यासह आम्ही निर्णायक कारवाई करू. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्न भाग्य, युवा निधी आणि शक्ती या पाच योजनांचा त्यांनी पुनरुच्चार केला.