ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - माजी सैनिक राम किशन गरेवाल यांच्या आत्महत्येबद्दल केंद्र सरकारने शंका उपस्थित केली आहे. कोणी प्रवृत्त केल्यामुळे राम किशन यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले का ? याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.
वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी न केल्यामुळे हरियाणातील राम किशन गरेवाल या माजी सैनिकाने दिल्लीत आत्महत्या केल्यानंतर दिल्लीत जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राम किशन यांच्या कुटुंबास भेटण्यास गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे बुधवारी दिल्लीतील वातावरण प्रचंड तापले होते. राहुल गांधी यांनी कुटुंबाला भेटू न दिल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली होती.
राम किशन यांनी ३१ ऑक्टोंबरला पत्र लिहीले आणि १ नोव्हेंबरला आत्महत्या केली त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. विष त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवले त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेचा कोणी फायदा घेत होते का ? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत असे अधिका-याने सांगितले.