- डाॅ. खुशालचंद बाहेती अलाहाबाद : श्रीराम, कृष्ण, गीता, रामायण, महर्षी वाल्मीकी, वेदव्यास हे या देशाचे सांस्कृतिक वैभव आहेत. हे विषय सर्व शाळांमध्ये अनिवार्य करून यावर शिक्षण देणारा कायदा संसदेने आणावा, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे.
सूर्यप्रकाश नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबुकवर राम-कृष्ण यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी टाकली होती. त्याच्या जामीन अर्जावर निकाल देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. राम-कृष्ण हे बहुसंख्य लोकांचे वर्षानुवर्षे दैवत आहेत. त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्यावर अश्लील टिप्पणी केल्याने त्यांना मानणाऱ्यांच्या भावना दुखावतात, असे करणे लोकांचा भावनंच्याच नव्हे तर भारतीय घटनेच्याही विरुद्ध आहे. असे करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अनेक देशात अशा गुन्ह्याला कठोर शासन देणारे कायदे आहेत. त्या मानाने भारतीय कायदे सौम्य आहेत. असे मत व्यक्त करीत न्यायालयाने जामीन मंंजूर केला.
या निकालात न्यायालयाने शिक्षणाची गरज नमूद केली. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. चांगले शिक्षण, चांगले नागरिक बनवतात. पाश्चीमात्यानी बनविलेल्या आजच्या शिक्षणाने देशाचे बरेच नुकसान झाले आहे. असे म्हणत न्यायालयाने राम-कृष्ण हे फक्त हिंदूंपुरते मर्यादित नव्हते तर मुस्लिमांतही ते लोकप्रिय असल्याचे अनेक दाखले दिले. यांच्या चारित्र्याचे शिक्षण देशातील सर्व शाळांमध्ये देणारा कायदा संसदेने केला पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
उच्च न्यायालयाचे मत- रवींद्रनाथ टागोर यांनी राम, कृष्ण, रामायण, महाभारत यात देशाचा आत्मा असल्याचे म्हटले आहे.- महात्मा गांधींच्या मनात रामाचे विशेष स्थान होते.- रामामुळे पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, गुरु-शिष्य, राजा-प्रजा यांचे आदर्श नाते समजते.- भारतीय घटनाकारांना राम, कृष्णाशिवाय घटना अपूर्ण वाटली म्हणून त्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर राम-कृष्ण यांची चित्रे काढली आहेत.
या देशात राहणाऱ्या प्रत्येकाने देवतांचा, महापुरुषांचा, देशाच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. किमान त्यांच्याबद्दल लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविणारी अश्लील टिप्पणी कोणीही करू नये.- न्या. शेखर यादव