Republic Day Parade 2024: एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला असून, दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाची मोठी धूम देशभरात पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण केल्यानंतर भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेसह आधुनिक शस्त्रे, संरक्षण सज्जतेसह सर्वप्रकारच्या सामर्थ्याचे दर्शन कर्तव्य पथावर घडले. यंदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांनी तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीताने भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती, वाढत्या स्वदेशी क्षमता आणि देशातील महिला शक्तीचे दर्शन कर्तव्य पथावर जगाला दिसले.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर रामलला, तर महाराष्ट्राच्या चित्ररथावर बाल शिवबा
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशचा चित्ररथ 'अयोध्या: विकसित भारत-समृद्ध विरासत' यावर आधारित आहे. चित्ररथाच्या पुढील भागात श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रतीक आहे, त्याचे बालपणीचे रूप दाखवले असून, मागे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि RRTS रेल्वेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
दरम्यान, झारखंड, गुजरात, लडाख, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड, ओडिशा, मणिपूर, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा यांसह अन्य राज्यांनी आपापली संस्कृती, सभ्यता, क्षमता यांचे दर्शन घडवणारे चित्ररथ साकारले होते.