- हरिश गुप्तानवी दिल्ली : भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक राम माधव यांना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. २०१४ मध्ये भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (पीडीपी) युती करून राज्यात सत्ता काबीज केली होती, त्यावेळी या युतीचे शिल्पकार राम माधव हेच होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीसोबत युती होण्याची धूसरशी शक्यताही नाही. त्यामुळे राम माधव यांच्यापुढे काश्मीरमधील ४७ जागांसाठी ‘छुपा पाठिंबा’ शोधण्याचे आव्हान आहे.
राम माधव यांच्याकडे आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांची जबाबदारी असली तरी २०२० मध्ये ते भाजप नेतृत्वापासून काहीसे दूर गेल्याचे चित्र होते. परंतु, त्यांची जम्मू-काश्मीरवरील पकड लक्षात घेता त्यांना भाजपने अचानक जम्मू-काश्मीरचे निवडणूक प्रभारी करून मोठी जबाबदारी टाकली आहे.
भाजपच्या चिंतेत वाढकाँग्रेसला मिळालेली नवसंजीवनी आणि त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी ९० जागांवर आघाडीला दिलेले अंतिम स्वरूप यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राम माधव यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. काश्मीर खोऱ्यातील ४७ जागांवर लढताना भाजपची काही अपक्ष आणि छोट्या पक्षांशी भागीदारी होऊ शकते; परंतु, थेट युती होण्याची शक्यता नाही. भाजप तेथे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्या उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे.