राममंदिर, कलम 370, CAA आणि ट्रिपल तलाक सारखे मुद्दे संपले. आता नंबर कॉमन सिव्हिल कोडचा (समान नागरी संहिता), असे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह शुक्रवारी भोपाळ दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी येथील भाजप कार्यालायत कोअर कमिटिची बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. यामुळे, आता देशात लवकरच कॉमन सिव्हिल कोड लागू होण्याची शक्यता आहे.
शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू. पण आपण पक्षाचे नुकसान होईल, असे कुठलेही काम करू नका.तत्पूर्वी शाह यांनी, देशात सर्व काही ठीक झाले? असा प्रश्न राज्यातील वरिष्ट नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढेच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. पण काळजी करण्याचे काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलेही आव्हान नाही, असेही शाह म्हणाले.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यानंतर, शाह BSF च्या विमानाने दिल्लीला परतले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार राकेश सिंह देखील त्यांच्यासोबत गेले.काय आहे कॉमन सिव्हिल कोड? थोडक्यात समजून घ्या -कॉमन सिव्हिल कोड (समान नागरी संहिता) लागू झाल्यानंतर, देशात लग्न, घटस्फोट, वारसदार आणि दत्तक घेणे, यांसारखे सामाजिक प्रश्न एकाच कायद्यांतर्गत येतील. यात धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकराची वेगळी व्यवस्था नसेल. घटनेतील कलम 44 असा कायदा तयार करण्याची शक्ती देते. हा कायदा केवळ केंद्र सरकारच संसदेच्या माध्यमाने लागू करू शकते.