अयोध्येतील राम मंदिराची काम आता अंतिम टप्प्यावर आले आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. काल राम मंदिरातील पहिल्या सोन्याच्या दरवाजाचा फोटो समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार असून यादरम्यान मंदिरात अभिषेकही करण्यात येणार आहे.
चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी
उद्घाटनापूर्वी मंदिराशी संबंधित नवनवीन माहिती आणि फोटो सातत्याने समोर येत आहेत. राम मंदिरात लावल्या जाणार्या सुवर्ण दरवाजाचा पहिला फोटो समोर आला आहे, यावर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दरवाजा १२ फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. हा दरवाजा नुकताच पहिल्या मजल्यावर बसवण्यात आला आहे.
राम मंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवण्यात येणार आहेत. यातील ४२ दरवाजे एकूण १०० किलो सोन्याने मढवले जाणार आहेत. मंदिराच्या पायऱ्यांजवळील चार दरवाजे सोन्याने मढवले जाणार नाहीत. येत्या काही दिवसांत आणखी १३ सोन्याचे दरवाजे बसवले जातील. राम मंदिराच्या गोल्डन गेटच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये मध्यभागी दोन हत्तींचे चित्र कोरण्यात आले आहेत.
दरवाजाच्या वरच्या भागात राजवाड्यासारखा आकार तयार करण्यात आला आहे. दरवाजाच्या तळाशी चौकोनी आकारात सुंदर कलाकृती आहे. हे दरवाजे तयार करण्यासाठी हैदराबादच्या एका कंपनीला निविदा देण्यात आली होती. कंपनीने महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलातून लाकूड निवडले होते.
दरवाजा तयार करण्यासाठी कन्याकुमारीहून कारागिरांना बोलावण्यात आले. दरवाज्यांचे फोटो येण्यापूर्वी राम मंदिराचे रात्रीचे फोटो समोर आले होते. या फोटोमध्ये राम मंदिर परिसर अतिशय भव्य दिसत आहे.