Ram Mandir Ayodhya: अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामललाची 51 इंची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आली. म्हैसूरच्या एचडी कोटे तालुक्यातील जयपुरा होबळी भागातील गुज्जेगौदनापुरा येथे आढळणाऱ्या खास काळ्या रंगाच्या खडकात ही मूर्ती बनवण्यात आली आहे.
आता त्या दगडाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीटीआयने राम मंदिर ट्रस्टच्या हवाल्याने सांगितले की, ज्या खडकापासून रामललाची मूर्ती बनवण्यात आली आहे, तो सूमारे 3 अब्ज वर्षे जुना खडक आहे. हा खडक अतिशय गुळगुळीत असतो, म्हणूनच याला सोप स्टोन म्हटले जाते. विविध शिल्पे बनवण्यासाठी सोप स्टोन आदर्श मानला जातो.
दगड कुठे सापडला?रामदास नावाच्या व्यक्तीच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करताना ही शिला आढळून आली. यानंतर एका स्थानिक कंत्राटदाराने ही माहिती मंदिर विश्वस्तांना दिली. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी प्राणप्रतिष्ठापनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, मला नेहमीच असे वाटत होते की, प्रभू राम माझे आणि माझ्या कुटुंबाचे सर्व वाईट काळापासून संरक्षण करत आहेत. त्यांनीच मला शुभ कार्यासाठी निवडले यावर माझा ठाम विश्वास आहे. मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे, असे ते म्हणाले.