अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. चांदीची वीट रचून मंदिराची पायाभरणी करण्यात येईल. या विटेचा पहिला फोटो समोर आला आहे. फैजाबादचे भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी विटेचा फोटो ट्विट केला आहे.ही पवित्र वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रचली जात असताना त्यावेळी मला तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. ते मी माझं सौभाग्य समजतो, असं लल्लू सिंह यांनी विटेचा फोटो ट्विट करताना म्हटलं आहे. या विटेचं वजन २२ किलो ६०० ग्राम इतकं आहे. ५ ऑगस्टला मोदींच्या चांदीची वीट रचून शिलान्यास करतील. ही चांदीची अयोध्येला पोहोचली आहे.पंतप्रधान मोदी वीट रचून मंदिराचा शिलान्यास करतील. या विटेवर मोदींचं नाव लिहिण्यात आलं आहे. याशिवाय जय श्रीराम हे दोन शब्द मध्यभागी आहेत. याशिवाय भूमिपूजनाची तारीख आणि मुहूर्तदेखील नमूद करण्यात आला आहे. विटेचं नेमकं वजनही लिहिण्यात आलं आहे. या विटेची किंमत १५ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
मंदिराचा पाया रचताना जमिनीखाली कॅप्सूल ठेवण्यात येणार नाहीराम मंदिराच्या २ हजार फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवली जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दोन दिवसांपूर्वी दिली होती. मात्र टाईम कॅप्सूलबद्दलची माहिती खोटी असल्याचं ट्रस्टच्या सचिव चंपत राय यांनी सांगितलं आहे. ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन करताना जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण राय यांनी दिलं.काय म्हणाले होते ट्रस्टचे सचिव कामेश्वर चौपाल? राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येईल, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी रविवारी सांगितलं होतं. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती चौपाल यांनी दिली होती.