Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. अल्पावधीच कोट्यवधींचे दान राम मंदिराला प्राप्त झाले आहे. अलीकडेच एका कैद्याने आपल्या श्रमाची रक्कम रामचरणी अर्पण केली होती. आता कैद्यांनी बनवलेल्या पिशव्यांमधून राम मंदिरातील प्रसाद देण्यात येणार आहे. ट्रस्टने याबाबत निर्णय घेतला आहे.
प्रत्येक राम भक्ताला मंदिरासाठी काहीतरी योगदान द्यायची इच्छा असते. अयोध्येत येणारे रामभक्त दर्शन आणि पूजेसाठी अनेक वस्तू आणि पैसे श्रीरामचरणी अर्पण करतात. फतेहपूरच्या येथील तुरुंगात कैद्यांनी स्वहस्ते बनवलेल्या ११०० पिशव्या राम मंदिराला अर्पण करण्यात आल्या. या पिशव्यांचा रंग केशरी असून, यावर श्रीरामांसह राम मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. या पिशव्या ट्रस्टला प्राप्त झाल्यानंतर सर्वजण अवाक् झाले. या पिशव्या सर्वांनाच आवडल्या. यानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तुरुंगातील कैद्यांना आणखी ५ हजार पिशव्या बनवण्याची विनंती केली आहे. कैद्यांनी तयार केलेल्या या पिशवीतून प्रभू रामललाच्या भक्तांना प्रसाद देण्यात येणार आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या मीडिया प्रभारींनी सांगितले की, ट्रस्टला कैद्यांनी बनवलेल्या राम मंदिराच्या चित्रासह छापलेल्या ११०० केशरी रंगाच्या पिशव्या प्राप्त झाल्या. यानंतर राम मंदिर ट्रस्टने कैद्यांना आणखी ५ हजार पिशव्या बनवण्याचे आवाहन केले आहे. ही पिशवी तयार करण्यासाठी सर्व धर्माच्या कैद्यांचा सहभाग होता. पॉलिथिन मुक्त भारत मोहिमेअंतर्गत तुरुंगातील कैद्यांनी या पिशव्या स्वतः तयार केल्या आहेत.या पिशव्यांमधून रामभक्तांना प्रसाद देण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये किरकोळ सुधारणा करण्यास सांगण्यात येणार असून, आकार वाढवला जाणार आहे. तशा प्रकारचे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे. या पिशव्या प्रसाद वाटपासाठी वापरल्या जातील, अशी माहिती शरद शर्मा यांनी दिली.
दरम्यान, याच फतेहपूर तुरुंगात असलेल्या झियाउल हसन या कैद्याने रामचरणी आपल्या श्रमाचे पैसे दान केले आहेत. या कैद्याने १०७५ रुपयांची रक्कम रामलालाचरणी अर्पण केली. या कैद्याने तुरुंगात स्वच्छता करण्याच्या मजुरीतून मिळणारी दीड महिन्याची कमाई रामलाला यांना समर्पित केली. त्याच्या विनंतीवरून कारागृह अधीक्षकांनी १०७५ रुपयांचा धनादेश अयोध्येला पाठवून दिला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हा धनादेश प्राप्त झाला आणि खात्यात जमा करण्यात आला.