अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने अयोध्येत दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.
दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आणि २९ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला तो शब्द पूर्ण केला. नरेंद्र मोदी हे १९९१ मध्ये म्हणजेच २९ वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते. त्यावेळी त्यांनी जेव्हा राम मंदिर उभं राहील तेव्हाच आपण पुन्हा अयोध्येत येऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार नरेंद्र मोदी आता तब्बल २९ वर्षांनी अयोध्येत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मानही त्यांनाच मिळाला आहे.
२९ वर्षांपूर्वी ‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. नरेंद्र मोदी १९९१ मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. त्यावेळी ‘तिरंगा यात्रे’ यात्रा कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. या यात्रेत मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधितही केले होते.
महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी नरेंद्र मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असा असा सवाल केला होता. त्यावर ज्या दिवशी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, तेव्हा मी पुन्हा येईन असे उत्तर दिले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी २९ वर्षांपूर्वी दिलेले आपले आश्वासन पूर्ण केले आहे.
१९९१ मध्ये महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेल्या फोटोत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. महेंद्र त्रिपाठी त्यावेळी विश्व हिंदू परिषदेसाठी फोटोग्राफर म्हणून काम करत होते. रामजन्मभूमीजवळच त्यांचा स्टुडिओ होता. राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेला मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदींचा फोटा पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.