नवी दिल्ली: देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.
राममंदीर भूमिपूजनाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय, तसतशी देशभरातील भाविकांमधील उत्सुकता शिगेला पोहचतोय. कुठल्या का मार्गाने होईना, या क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे, तो क्षण याचि देहा, याचि डोळा अनुभवावा, अंतर्मनात तो कायमचा साठवून ठेवावा, हीच आस भाविकांच्या मनीमानसी दाटली आहे.
आज होणाऱ्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पूजाअर्चेला सुरुवात झाली असली, तरी कोट्यावधी भाविकांचे डोळे लागले आहेत, ते मुख्य मुहूर्ताकडे. हा मुहूर्त आहे केवळ ३२ सेकंदाचा. दूपारी १२ वाजून ४४ मिनिटे ८ सेकंद या ३२ सेकंदांच्या पवित्र मुहूर्तावरच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावे, यावर सारा कटाक्ष आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांची उपस्थिती नियंत्रित करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्यात आले आहे. राम जन्मभूमि परिसर आणि आजूबाजूच्या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेसाठी प्रवेश करताना सिक्यूरिटी कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. ते कोड एकदाच वापरता येणार आहेत. तसेच पोलीस उपस्थितांच्याही तपासण्या करणार आहेत.