नवी दिल्ली- राम मंदिराच्या मुद्द्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केलं आहे. राम मंदिराचं प्रकरण हे दोन्ही पक्षांची चर्चा करून सोडवलं पाहिजे. जेव्हा राम मंदिराचं निर्माण केलं जाईल, तेव्हा त्यासाठी मीसुद्धा एक वीट रचेन, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले आहेत. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली आहे. 10 जानेवारी रोजी नव्या पीठाच्या स्थापनेनंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.फारुक अब्दुल्ला म्हणाले, भगवान रामाशी कोणाचीही शत्रुता नको, त्यामुळे हा वाद चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा असं घडले, तेव्हा राम मंदिरासाठी मीसुद्धा वीट रचेन, राम मंदिराच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. आज फक्त 60 सेकंदांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी उरकली. सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोर्टानं सध्या अन्य प्रकरणेही प्रलंबित असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात 14 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने 9 मे 2011 मध्ये या निर्णयाला स्थगिती दिली होती.
...तर राम मंदिरासाठी मीसुद्धा वीट रचेन, अयोध्या वादावर फारुक अब्दुल्लांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:41 PM