Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : प्रभू श्रीरामांच्या अयोध्या येथील बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनेक दशकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२:२० वाजता रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. तसंच प्रभू श्रीरामांचं भव्य, दिव्य आणि लोभस रूप पाहून संपूर्ण देश भक्तिरसात नाहून निघाला आहे.
वाराणसीचे आचार्य गणेश्वर दविड व आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात व १२१ पुरोहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला असून रामललांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. तसंच गळ्यात हिरे-मोत्यांचा हार, हातात सुवर्ण धनुष्यबाण असून सुवर्ण रंगाचं धोतर घातलेल्या रुपात प्रभू श्रीराम दिसत आहेत.
प्राणप्रतिष्ठेसाठी रामललांची मूर्ती निवडताना काही निकष ठेवण्यात आले होते. यामध्ये पहिला निकष होता की या मूर्तीचा चेहरा दिव्य तेज असलेला पण लहान मुलासारखा निरागस असावा. भगवान राम हे अजानबाहू होते. त्यामुळे हात लांब असावेत, असे निकष ठेवण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठेनंतर अशाच रुपातील प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात विराजमान झालेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती पार पडली.