Ram Mandir Ayodhya, Tej Pratap Yadav: आज राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने देश विदेशातील लोक उपस्थित राहिले आहेत. तब्बल ८ हजार पाहुण्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानुसार बहुतांश लोक येथे हजर झाले आहेत. पण याच दरम्यान सोहळ्याआधी नेते आणि लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एक ट्विट करत काहींना टोला लगावला आहे.
"राम सगळ्यांच्याच मनात आहे. पण अंधभक्तांनी प्रभू श्रीरामाबद्दल बोलण्याआधी आपल्या मनात असलेल्या रावणाला बाहेर काढा. कारण राम कोणताही भेदभाव करत नाहीत. सर्वप्रथम महिलांवर होणारे अत्याचार बंद व्हायला हवेत. गरीबीरूपी रावणाचा कसा खात्मा करायचा याचा विचार व्हायला हवा. प्रभू श्रीरामाचे राज्य आणायचे असेल तर वाईट विचार हद्दपार करा आणि देशात सद्भाव, सुख, समाधान नांदेल असे प्रयत्न करत राहा," अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे.