Ram Mandir Inauguration: श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यावरुन भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्याने त्यांचे खरे चेहरे देशासमोर उघड झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. दरम्यान, या वादावर आज खरगे यांनी प्रतिक्रिया दिली.
खरगे म्हणाले की, “मला मिळालेले निमंत्रण वैयक्तिक आहे, याबद्दल मी नंतर कधी बोलेन. रामावर विश्वास असलेले लोक आज, उद्या किंवा परवा जाऊ शकतात. ज्यांना जे हवे ते करू शकतो, असे मी 6 तारखेलाच म्हणालो होतो. तरीही आमच्यावर टीका करणे योग्य नाही. हे भाजपचे षडयंत्र आहे, याला ते मुद्दा बनवत आहेत. आमचा उद्देश कोणत्याही धर्माला दुखावण्याचा नाही."
काँग्रेस काय म्हणाली?काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (13 जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेडा म्हणाले की, 22 जानेवारीला अयोध्येत होणारा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा धार्मिक नसून पूर्णपणे राजकीय आहे. हे नियमानुसार आणि चार पीठांच्या शंकराचार्यांच्या देखरेखीखाली केले जात नाही. मंदिरात कोण यावं आणि कोणी नाही, हे सांगणारे तुम्ही कोण? प्राणप्रतिष्ठेत VVIP एंट्री आणणारे तुम्ही कोण? जाहिरातीत बोट धरून प्रभू रामाला चालायला लावणारे तुम्ही देवाच्या वर आहात का? आम्ही आमच्या देवाला भेटायला जायचे की नाही, हे कोणताही राजकीय पक्ष ठरवू शकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.