Ram Mandir Inauguration: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ येत आहे. पण, देशातील चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध दर्सवला आहे. यातच आता ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यापूर्वी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी श्रीरामाच्या जुन्या मूर्तीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
जुन्या मूर्तीचे काय होणा?
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, काल बातम्यांमधून माहिती मिळाली की, रामललाची मूर्ती एका ट्रकमध्ये भरुन अर्धवट तयार झालेल्या मंदिरात आणली आहे. या मूर्तीची नव्याने बांधलेल्या श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. पण, श्रीरामलला विराजमान(जुनी मूर्ती) आधीपासून मंदिरात आहे. आता प्रश्न पडतो की, नवीन मूर्ती बसवली तर जुन्या मूर्तीचे काय होणार?
ते पुढे म्हणतात की, हे नवे मंदिर श्री रामलला विराजमानासाठी बांधले जात आहे, असा समज राम भक्तांमध्ये होता. पण आता या मंदिराच्या गाभार्यात नवीन मूर्ती आणली गेली आहे. लक्षात ठेवा, हे तेच रामलला विराजमान आहेत, जे श्रीराम जन्मभूमितून प्रकट झाले आहेत. मुस्लिम चौकीदारानेही याची साक्ष दिली आहे. ज्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने सामोरे गेले, ज्यांनी वर्षानुवर्षे तंबूत राहून ऊन, पाऊस, थंडी सहन केली, ज्यांनी कोर्टात केस लढवली आणि जिंकली. यासाठी भितीनरेश राजा महताब सिंह, राणी जयराजराजकुंवर, पुजारी पंडित देविदिन पांडे, हंसवरचे राजा रणविजय सिंह, असंख्य संतांनी आणि रामभक्तांनी बलिदान दिले आहे.
ज्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती सापडते, ती इतर ठिकाणी स्थापित केली जाऊ शकत नाही. हे प्रकरण कोर्टात असतानाही वकिलांनी हाच मुद्दा मांडला होता. आता आमची विनंती आहे की, मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान, म्हणजेच जुनी मूर्ती स्थापित करावी. अन्यथा हे कार्य इतिहास, लोकभावना, धर्मशास्त्र आणि नैतिकतेच्या विरोधात असेल. असे न केल्यास रामलला विराजमानवर खुप मोठा अन्याय होईल. आम्ही आशा करतो की, आमचे म्हणने तुमच्यापर्यंत पोहचले असेल आणि तुम्ही यावर विचार कराल, असं अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.