Ram Mandir inauguration: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, हा सोहळा खास बनवण्यासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) अयोध्येला एक लाख लाडू पाठवणार आहे.
तिरुपती देवस्थानचे लाडू खूप खास असतात, भाविकांमध्ये या लाडूंची प्रचंड मागणी असते. यामुळेच तिरुपती मंदिराने पाठवलेले लाडू अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे टीटीडीने म्हटले आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक 22 तारखेला अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तिरुपतीमध्ये भाविकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या लाडूंचे वजन 176 ग्रॅम ते 200 ग्रॅम असते. पण, अयोध्येला पाठवल्या जाणाऱ्या छोट्या लाडूंचे वजन फक्त 25 ग्रॅम असेल. हे लाडू फक्त तिरुमला मंदिराच्या खास स्वयंपाकघरात तयार केले जातील. या स्वयंपाकघरात भगवान व्यंकटेश्वर स्वामींसाठी प्रसाद तयार केला जातो.
टीटीडीचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी म्हणाले की, अयोध्येत येणाऱ्या भाविकांना वाटण्यासाठी आम्ही एक लाख लाडू बनवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आम्हालाही हातभार लावायचा आहे, म्हणूनच आम्ही खास प्रसाद पाठवत आहोत. सर्व लाडू तयार झाल्यावर ते अयोध्येला पाठवले जातील. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.