अयोध्येत राम मंदिरामध्ये होत असलेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट, केंद्र सरकार आणि भाजपाकडून जय्यत तयारी सुरू आहे. तर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणांमुळे विरोधी पक्षांमधील नेत्यांची कोंडी झालेली आहे. या सोहळ्याला जावं की न जावं, यावरून अनेक नेते द्विधा मनस्थितीत आहेत. या सोहळ्याचा भाजपाला राजकीय लाभ मिळेल, असा दावा केला जात आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर आता विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी तोडगा काढला आहे. त्यानुसार आता विरोधी पक्षांमधील नेत्यांनी आपापल्या पद्धतीने २२ जानेवारी रोजी मंदिरांमध्ये जाण्याची योजना आखली आहे. त्यानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी हे २२ जानेवारी रोजी गुवाहाटी येथील शिव मंदिर आणि कामाख्या मंदिरात जाण्याची शक्यता आहे. तर ममता बॅनर्जी ह्या कोलकाता येथे काली पूजा करणार आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये सुंदर कांडाचं पठण करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २२ जानेवारी रोजी गुवाहाटी येथील लोखरा य़ेथे असलेल्या शिवमंदिराला भेट देण्याचा कार्यक्रम आखला आहे. याच दिवशी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित आहे. मणिपूर येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी आसाममध्ये दाखल होणार आहे. राहुल गांधी यांनी आधीच आपण शिवभक्त असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, राहुल गांधी हे प्रत्येक धर्माच्या धर्मस्थळावर जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र राहुल गांधी यांच्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा झालेली नाही.
तर अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी २२ जानेवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकातामधील सर्व धर्माच्या लोकांसोबत एक सद्भावना रॅलीचं नेतृत्व करतील. तसेच कालीघाट मंदिरामध्ये देवी कालीची पूजा केल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या मोर्चाला सुरुवात करतील. हा मोर्चा पार्क सर्कस मैदान येथे समाप्त होणार आहे. याआधी ही मशीद, चर्च आणि गुरुद्वारांसह विविध धार्मिक स्थळांना भेट देईल.