नवी दिल्ली - मुलायम सिंह यादव यांची छोटी सून अपर्णा यादव राम मंदिर विवादावर भाजपा/आरएसएसच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहे. ''मला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अयोध्येत राम मंदिराचेच निर्माण व्हावे... असं मला वाटते'', राम मंदिर विवादावर बोलताना अपर्णा यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य यादव यांच्यासोबत देवा शरीफ दर्गा येथे आल्या असताना अपर्णा यांनी ही प्रतिक्रिया दिली. आदित्य यादव हे शिवपाल यादव यांचे पुत्र आहेत.
(राममंदिरासाठी सरकारने जमीन ताब्यात घ्यावी; संघाचा दबाव वाढला)
हिच बातमी हिंदीतही वाचा :
(मुलायम सिंह यादव की छोटी बहू ने अयोध्या विवाद पर बीजेपी से मिलाया सुर, कहा- बनना चाहिए राम मंदिर)
अयोध्येत मशिद बांधले जाऊ नये का?, असाही प्रश्न मीडियानं अपर्णा यांना विचारला. या प्रश्नाचं त्यांनी अतिशय हुशारीनं उत्तर दिले. रामायणात याच जागेवर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे येथे मंदिरच बनवण्यात यावे.
राम मंदिर विवादावर भाजपाला समर्थन देत आहात का?, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कोणालाही समर्थन देत नाहीय, मी फक्त रामासोबत आहे. दरम्यान, आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्या कारणामुळे प्रत्येकजण आपापल्या परिनं राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा करताना दिसत आहेत.
(राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव)
दरम्यान राम मंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीन महिने म्हणजेच जानेवारी २0१९पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी संत-महंत, विश्व हिंदू परिषद, तसेच संघ परिवारातील अनेक संघटना, तसेच गिरीराज सिंह यांच्यासारखे केंद्रीय मंत्री अतिशय आक्रमक झाले आहेत. कोणतीही वाट न पाहता ६ येत्या डिसेंबर रोजी राम मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, असा थेट इशारा संत महंतांनी सरकारला दिला आहे. आता आम्ही थांबणारच नाही, असे म्हटले आहे. काही नेत्यांनी तर सर्वोच्च न्यायालय काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला आहे.