भारतीयांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. आज रामलला अयोध्येत विराजमान होणार आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. अनेक VVIP देखील दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अनेक हायटेक कंपन्यांचा वापर करण्यात आला आहे.
राम मंदिरासह VVIP च्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी AI तंत्रज्ञानापासून ते 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन आदी सर्व गोष्टींचा वापर केला जात आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी हायटेक तयारी केली गेली आहे.
पीटीआयने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येवर नजर ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच अँटी माइन ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे.
AI ड्रोन संपूर्ण अयोध्येवर पाळत ठेवणार असल्याचंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. याशिवाय अँटी माइन ड्रोन देखील जमिनीवर लक्ष ठेवतील, जे स्फोट इत्यादींपासून संरक्षण करण्याचं काम करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीपासून 1 मीटर उंचीवर काम करणारे अँटी माइन ड्रोन आधुनिक तंत्रज्ञानाने येतात. यामध्ये स्पेक्ट्रोमीटर वेवलेंथ डिटेक्शन आहे, जे जमिनीखाली लपलेली स्फोटकं शोधण्यात सक्षम असतील.
संपूर्ण अयोध्या जिल्ह्यात 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यापैकी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात महत्त्वाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे व्हीव्हीआयपी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.