बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 04:16 PM2024-01-20T16:16:27+5:302024-01-20T16:17:46+5:30
Mani Shankar Iyer: अयोध्येतील बाबरी मशिदीचं ताळं उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच त्यावरून राजकारणही जोरात सुरू झालं आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही या विषयी एक मोठा दावा केला आहे, त्यावरून आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटू शकते. अयोध्येतील बाबरी मशिदीचं कुलूप उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक तोंडांवर असताना मणिशंकर अय्यर यांच्या पुस्तकाचीही चर्चा सुरू आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्याबाबतचा दोष राजीव गांधी यांना देता कामा नये. तर त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं पाहिजे. हे कुलूप उघडलं गेलं आणि मोठ्या संख्येने हिंदू भाविकांना गोळा केलं गेलं.
मणिशंकर अय्यर या पुस्तकात अंदाज वर्तवताना लिहितात की, जर राजीव गांधी जीवित असते आणि नरसिंह राव यांच्या जागी पंतप्रधान असते तर बाबरी मशीद अजूनही तिथेच उभी राहिली असती. भाजपालाही योग्य उत्तर दिलं गेलं असतं. तसेच आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जसा निकाल दिला तसाच कुठला तरी तोडगा निघाला असता.
दरम्यान, २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारण्याच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचे मणिशंकर अय्यर यांनी कौतुक केले आहे. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या ‘द राजीव आय न्यू अँड व्हाय ही वॉझ इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टुड प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचं अनावरण करताना वरील मत मांडलं आहे.