Ram Mandir inauguration: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही क्षणाक्षणाचे अपडेट्स घेत आहेत. 22 जानेवारीचा हा भव्य सोहळा भारतातच नाही, तर अमेरिकेतही लाईव्ह दाखवला जाणार आहे. न्यूयॉर्कमधील 'टाइम्स स्क्वेअर'वर थेट प्रक्षेपित होणार आहे.
देशातील सर्व राज्यांमध्ये प्रसारित होण्याबरोबरच परदेशातील विविध भारतीय दूतावासांमध्येही राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
याशिवाय, भारतीय जनता पक्षाने (भाजप) राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे देशभरातील बूथ स्तरावर थेट प्रक्षेपण करण्याची योजना आखली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे, अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी वैदिक विधी 16 जानेवारीपासूनच सुरू होईल. 22 जानेवारी रोजी राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देश-विदेशातील विविध व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुमारे 60,000 लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.