अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी १०० चार्टर्ड विमानं अयोध्या येथील विमानतळांवर उतरणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर रोजी केलं होतं.
अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी व्यावसायिक विमानांबरोबरच १०० हून अधिक विमानांमधून ८ हजारांहून अधिक पाहुणे येणार आहेत. यामध्ये देशाबरोबरच परदेशातून ४० हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुणे आपल्या विमानांमधून अयोध्येत येऊ इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे २१ आणि २२ जानेवारी रोजीची प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये १ लाखांहून अधिक भाविक अयोध्येमध्ये येण्याची शक्यता आहे.
अयोध्येतील विमानतळावर आठ शहरांमधून व्यावसायिक आणि चार्टर्ड विमानं उतरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लखनौ, दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आणि पणजी या शहरांचा समावेश आहे. विमानतळाच्या संचालकांनी सांगितलं की, अयोध्येतील आंततरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक विमान व्यवस्थापनाचं उदाहरण सादर करणार आहे. कारण विशेष प्रसंगी येणाऱ्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या स्वागतासाठी कर्मचाऱ्यांना विशेषकरून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
दरम्यान, अनेक विमानं ही प्रयागराज, गोरखपूर आणि वाराणसी विमानतळावर उभी केली जातील. एमव्हीआयपी २४ तास काम करेल. त्यामुळे धुके आणि अंधाराच्या स्थितीतही उड्डाणांचं संचालन करणे सोपे होईल. त्याबरोबरच जर कुठल्या एअरलाइन्सने २१ आणि २२ जानेवारी रोजी उड्डाणं निर्धारित केली असतील तर व्यावसायिक विमानंही आपली उड्डाणं सुरू ठेवतील.