Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या उरी येथे राहणारी बतूल जहरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बतूल जहराने पहाडी भाषेत एक भजन गायले आहे. तिचा हा राम भजन गायनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या भजनात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही स्तुती केली.
या व्हिडिओमध्ये जहरा काश्मीरच्या पहाडी भाषेत म्हणते, 'आपल्या पंतप्रधानांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी 11 दिवसांचा उपवास धरला आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. सर्वत्र रामाची गाणी गायली जाताहेत. आपला जम्मू-काश्मीरही यात कमी नाही.' यानंतर ती थेट गायला सुरू करते. या पहाडी गाण्यात झहरा म्हणते, 'श्रीरामासोबत सीतामाता आणि हनुमानही येत आहेत. तो दिवस अखेर जवळ आलाय, त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी ढोल वाजवावे.'
विशेष म्हणजे, यापूर्वी बतूल जहरा इंटरमिजिएट परीक्षेत चांगले गुण मिळवून पहिल्यांदा चर्चेत आली होती. डोंगराळ भागात राहणारी जहरा अनेकदा पायीच शाळेत जात असे. अशा परिस्थितीत मुलभूत सुविधांचा अभाव असतानाही बारावीत चांगले गुण मिळवल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले. जहराला मोठी झाल्यावर आयएएस अधिकारी व्हायचे आहे.