अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांची प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. शिल्पकार अरुण योगिराज यांनी घडवलेल्या रामललांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आली होती. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी एकून तीन मूर्ती घडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका मूर्तीची निवड झाल्यानंतर उर्वरित दोन मूर्ती कशा आहेत आणि त्यांचं आता काय करणार हा प्रश्न भक्तांना पडला आहे. या दोन मूर्तींचे फोटो आता समोर आले असून, या मूर्तींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मंदिरात प्राणप्रतिष्ठापित करण्यात आलेली मूर्ती अरुण योगिराज यांनी घडवली आहे. तर दुसरी मूर्ती ही सत्यनारायण पांडे यांनी घडवली आहे. तर तिसरी मूर्ती ही गणेश भट्ट यांनी घडवली आहे. सत्यनारायण पांडे यांनी घडवलेली अलंकृत रामललांची दुसरी मुर्ती ही मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर स्थापित केली जाण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या मूर्तीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. शास्त्रांमध्ये निलांबुजम श्यामम कोमलांगम... असं वर्ँ. असल्याने श्यामल रंगाच्या मूर्तीला गर्भगृहात स्थापन करण्यात आलं आहे.
गणेश भट्ट यांनी साकारलेली रामललांच्या मूर्तीला नवनिर्मित राम मंदिरामध्ये स्थान मिळालेलं नाही. ५१ इंच उंच या मूर्तीची छायाचित्रे आता समोर आली आहेत. मंदिर ट्रस्टने ही मूर्ती मंदिर परिसरात स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. श्यामशिलेमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीने रामभक्तांचं लक्ष वेधून घेतलं आहे.