नवी दिल्ली - 'राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्यासह ट्रस्टच्या सदस्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी ट्रस्टच्या वतीने मोदींना राम जन्मभूमी अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या वेळी ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय आणि कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी देखील उपस्थित होते. मोदी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महंत नृत्य गोपाल दास म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी अयोध्येला येण्याविषयी विचार करणार असल्याचे दास यांनी सांगितले.
दरम्यान राम मंदिर ट्रस्टकडून भूमीपुजनाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांत तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही शिष्टाचार म्हणून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे महंतांनी सांगितले. तर विहिपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, रामनवमी निमित्त 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत अयोध्येत राम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महंत नृत्य गोपालदास दास यांना राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष प्रबंध तर विहिपच्या चंपत राय यांना महासचिव करण्यात आले आहे.