चेन्नई : नोटाबंदीनंतर करचोरी प्रकरणात सापडलेले तामिळनाडूचे माजी मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करचोरी प्रकरणात राव यांच्या निवासस्थानावर तसेच कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच आठवड्यात छापे टाकले होते.शनिवारी दुपारी १ वा. छातीत दुखत असल्याची तक्रार राव यांनी केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील श्री. रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. राव यांची २२ डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या मुख्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी अतिरिक्त मुख्य सचिव गिरिजा वैद्यनाथन यांची नेमणूक करण्यात आली होती. राव यांच्या अण्णानगर निवासस्थानी आणि तसेच त्यांचे पुत्र आणि अन्य नागरिकांच्या प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापे मारले होते. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीसाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. (वृत्तसंस्था)प्रचंड मालमत्ता२१ डिसेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर छापे मारले आहेत. या छाप्यात ३0 लाखांची रोख रक्कम आणि ५ किलो सोने सापडले होते. याशिवाय ५ कोटींची बेहिशेबी मालमत्ताही सापडली होती. त्यांच्या एकूण १५ तळांवर आयकर विभागाने छापे मारले होते. त्यांचे पुत्र विवेक यांच्या काही ठिकाणांवरही छापे मारण्यात आले होते. याशिवाय काही नातेवाईकांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली होती. आंध्र प्रदेशातील काही ठिकाणीही प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती.
राम मोहन राव अखेर रुग्णालयात
By admin | Published: December 25, 2016 12:51 AM