नवी दिल्ली : आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणूक, कीर्तन, प्रवचन यांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून, या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या मूर्तीस फुलांच्या हारांसमवेतच साखरेचे हारही अर्पण केले जातात. विविध मंदिरांमध्ये भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी तर हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला, गीतरामायणाच्या गायनाने समारोप होणार आहे.
राम नाम आणि रामनवमीची महतीराज्यभरातल्या राम मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रामजन्माच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. साईंची नगरी शिर्डी सध्या राम नामाच्या जयघोषात दुमदुमली आहे. शिर्डीमध्ये तीन दिवस रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. साई मंदिरात सकाळी काकड आरती करण्यात आली. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी रामनाम आणि साईनामाच्या गजरात शिर्डी दुमदुमून गेली. तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत. राज्याच्या विविध भागातून आणि शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातूनही भाविक शिर्डीत पोहचलेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालख्याही शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
मुंबईतील वडाळ्याच्या राममंदिरातही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दुपारी पाळणा गीत गात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. दिवसभर मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रामनवमीच्यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीस पानांची आरास करण्यात आली आहे. नाशिकचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता मुख्य मंदिरात उत्सवाचे मानकरी, पुजारी, विश्वस्त यांच्या उपस्थितीत रामजन्म साजरा केला जाणार आहे. यावेळी मंत्रोच्चारात पुजारी पौरोहित्य करतील. राममंदिराच्या आवारात महिला भगिनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून रामजन्माच्यानिमित्ताने भजन गीत, सादर करतील. रामनवमीच्यानिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.