चंदीगड: रणजीत सिंह हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुलामधील विशेष सीबीआय न्यायालय देरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह पाच आरोपींना आज शिक्षा देईल. आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सिरसा येथील पोलीस सतर्क आहेत. शहरापासून डेरा सच्चा सौदाकडे जाणारे सर्व रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच, निमलष्करी दलांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
कायदेतज्ञांच्या मते, न्यायालयाने ज्या कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले आहे, त्यामध्ये जन्मठेप आणि फाशीची तरतूद आहे. डेरामुखी गुरमीत राम रहीम सिंह आणि कृष्ण कुमार यांना आयपीसीच्या कलम 302 आणि 120 बी अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. आयपीसीच्या कलम 302 अन्वये, आजीवन कारावास आणि 120-बी कमीतकमी सात वर्षे आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
राम रहिम इतर गुन्ह्यात दोषीसीबीआयच्या विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांनी सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपीला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, यापूर्वीच गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. याशिवाय तो पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
कलम 144 लागूआजच्या निर्णयामुळे पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र करण्याची परवानगी नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी आहे. आयटीबीपीच्या चार तुकड्या सीबीआय कोर्ट कॉम्प्लेक्स आणि चारही प्रवेशद्वारांवर तैनात केल्या जातील.
काय आहे प्रकरण ?कुरुक्षेत्रातील रहिवासी आणि डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचा सदस्य रणजीत सिंह याची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम, डेराचा तत्कालीन व्यवस्थापक कृष्ण लाल, अवतार, जसबीर आणि सबदील यांना पंचकुला येथील हरियाणा विशेष सीबीआय न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवलं होतं. मारेकऱ्यांमध्ये पंजाब पोलिस कमांडो सबदील सिंग, अवतार सिंग, इंदरसेन आणि कृष्णलाल यांचा समावेश होता. रणजीत सिंहची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी वापरलेली शस्त्रे डेराच्या आश्रमात लपवली होती.