सिरसा- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी प्रियंका तनेजा ऊर्फ हनीप्रीत इन्सा सध्या तुरूंगात आहे. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसा भडकविण्याच्या आरोपात हनीप्रीत अटक केली असून तिची कसून चौकशी केली जाते आहे. पण आता हनीप्रीतला तुरूंगात मिळत असलेल्या वागणुकीबद्दल धक्कादायक माहिती समोर येते आहे. हनीप्रीतला तुरूंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती इंडिया टूडे ने दिली आहे. सुत्रांकडून इंडिया टूडेला ही माहिती मिळाली आहे.
पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविल्याप्रकरणी गेल्या महिन्यात हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ती अंबाला कारागृहात आहे. पंचकुलात हिंसाचार पसरविणाचा आरोप असलेल्या 43 फरार लोकांमध्ये हनीप्रीतचं नाव सगळ्यात टॉपवर होतं.अंबाला तुरूंगात असलेल्या हनीप्रीतला तेथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. हनीप्रीतला तुरूंगातील जेवण आवडत नसल्याने तिला घरी बनवलेलं जेवण तुरूंगात दिलं जातं. तसंच तुरूंगातील उच्च सुरक्षा केंद्रात हनीप्रीतच्या कुटुंबीयांची गाडी यायला तुरूंग अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याचा आरोप केला जातो आहे.
दरम्यान, अंबाला तुरूंग अधिकाऱ्यांनी हनीप्रीतला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तुरूंग प्रशासनावर केलेले आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तुरूंगातील कुठल्याही कैद्याला व्हीआयपी वागणूक दिली जात नाही. हनीप्रीतला घरचं जेवण दिलं जात असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचं तुरूंग प्रशासनाचं म्हणणं आहे. तुरूंगाच्या नियमांप्रमाणे प्रत्येकाला समान वागणूक दिली जात असल्याचंही तुरूंग प्रशासनाचं म्हणणं आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला होता. हा हिंसाचार घडवून आणण्यासाठी हनीप्रीतने करोडो रूपये दिल्याचं काही समर्थकांनी सांगितलं होतं.