नवी दिल्ली : अयोध्येत वादग्रस्त रामजन्म स्थानापासून सहा किमी अंतरावर राम-रामायण संग्रहालय उभारण्यात येणार आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार मिळून २५ एकर जागेवर हे संग्रहालय साकारणार आहेत. यासाठी २२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त करून, अयोध्येतील एक जागाही ठरवली होती. मात्र, तत्कालीन अखिलेश सरकारने ही जागा देण्यास नकार दिला होता. मार्चमध्ये राजकीय चित्र बदलल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या काठावरील २५ एकर जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे, संग्रहालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.या संग्रहालयाची मुख्य वास्तू राम जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेपासून सहा कि.मी. अंतरावरील राहील. हे संग्रहालय एखाद्या भव्य मंदिरासारखे असेल. तेथे व्हर्चुअल रिअॅलिटी, थ्री डी डिस्प्ले यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध राहणार असून, प्राचीन परंपरांच्या प्रदर्शनासाठी त्यांचा उपयोग केला जाईल. भाविकांसह पर्यटकांसाठीही ते खुले राहील. हे संग्रहालय १८ महिन्यांत उभारण्यात येणार आहे. ऐन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते साकारलेले असेल. भाजपा निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करू शकते. राम खरेच होता का?या संग्रहलायचा स्कल्प प्रस्ताव केंद्र सरकारने नेमलेल्या रामायण सर्किट नॅशनल कमिटीचे अध्यक्ष राम अवतार यांनी तयार केला आहे. त्यांच्या मते राम हे केवळ काल्पनिक पात्र नाही तर ते एक ऐेतिहासिक व्यक्तिमत्व आहे.तथापि, धर्मग्रंथ आणि रामायणावर आधारित लोककथांना सोडून भगवान राम यांचे अस्तित्व होते याचा कोणताही पुरावा नाही.अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक हर्ष कुमार म्हणाले की,भगवान राम हे काल्पनिक पात्र असल्याचे मी मानतो. त्यांच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे इतिहासात नाहीत. मात्र, भारतात त्यांची मोठी पारंपरिक आणि सांस्कृतिक लाट आहे. संग्रहालय उभारण्यामागे सांस्कृतिक आणि भारतीय परंपरांना चालना देणे हा उद्देश असेल तर मला काही म्हणायचे नाही. पण जर हा राजकीय अजेंडा असेल तर ते राम या काल्पनिक पात्राचे प्रतिनिधित्व कसे करतील?
अयोध्येत राम-रामायण संग्रहालय
By admin | Published: May 15, 2017 5:48 AM