नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान हिंदी महासागरामध्ये राम सेतू असल्याच्या दाव्यावरून वेळोवेळी वादविवाद होत असतात. दरम्यान, रामसेतूबाबत भाजपाने विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, रामसेतूबाबत केंद्रातील मोदी सरकारने संसदेत धक्कादायक उत्तर दिले आहे. हरियाणामधील राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी रामसेतूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार आपल्या गौरवशाली इतिहासाबाबत काही शास्त्रीय शोध घेत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राम सेतूच्या अस्तित्वाबाबत कुठलाही सबळ पुरावा नाही आहे.
जितेंद्र सिंह म्हणाले की, आमच्या खासदाराने रामसेतूबाबत प्रश्न विचारला त्याबाबत मला आनंद आहे. मात्र या मुद्द्याबाबत आमच्या काही मर्यादा आहेत. कारण हा सुमारे १८ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ज्या सेतूबाबत चर्चा होत आहे तो सुमारे ५६ किमी लांब होता. स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समुद्रामध्ये दगडांचे काही तुकडे दिसून आले आहेत. तसेच त्यामधील काही आकृत्यांमध्ये सातत्य आहे, याचा शोध आम्ही घेतला आहे. समुद्रामध्ये काही बेटे आणि चुनखडकासारख्या काही गोष्टी दिसल्या आहेत.
जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, स्पष्ट शद्बांमध्ये सांगायचं तर रामसेतूचं प्रत्यक्ष स्वरूप तिथे अस्तित्वात आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र काही संकेत असेही आहे ज्यामधून तिथे काही बांधकाम अस्तित्वात असू शकते. आम्ही प्राचीन द्वारका आणि अशा प्रकरणांच्या अभ्यासासाठी काम करत आहोत.
भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या रामसेतूबाबत वेगवेगळे दावे केले जात असतात. रामसेतूवरून भाजपाकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येतो की, काँग्रेस रामसेतूच्या अस्तित्वाला मान्य करत नाही. आता संसदेत सरकारने दिलेल्या उत्तरावरून हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून, काँग्रेस या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहे.
श्रीरामांनी या सेतूची निर्मिती केली असे कोट्यवधी हिंदू मानतात. लंकेमध्ये पळवून नेण्यात आलेल्या सीतामाईला सोडवून आणण्यासाठी वानरांच्या सैनेच्या मदतीने हा पूल बांधण्यात आला असे रामायणात वर्णन केले आहे. तामिळनाडू राज्यातील पांबम बेटापासून सुरु झालेली ही खडकांची मालिका श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत जाते. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी हा पूल उद्ध्वस्त करण्य़ाचा निर्णय झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकल्पांतर्गत ८३ किमी लांबीचा कालवा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल तोडून मन्नार आणि पाल्कची सामुद्रधुनी जोडली जाणार आहे. अमेरिकेच्या एका विज्ञानविषय कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिनीने हा पूल नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे असे स्पष्ट करणारा कार्यक्रम दाखवला होता. त्यासाठी नासाच्या छायाचित्रांचा आधार घेण्याच आला होता.