नवी दिल्ली -भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा राम सेतू केव्हा आणि कसा तयार झाला? याचा शोध घेण्यासाठी यावर्षी राम सेतू असलेल्या भागात अंडर वॉटर प्रोजेक्ट चालवला जाणार आहे. यातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासंदर्भात, भारतीय पुरातत्व खात्याच्या (एएसआय) केंद्रीय सल्लागार समितीने गेल्या महिन्यात सीएसआयआर- नॅशनल इन्स्टियूट ऑफ ओशनोग्राफीने (एनआयओ) केलेल्या अर्जाला मंजुरी दिली आहे.
राम सेतूशी संबंधित या संशोधनात रेडियोमॅट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसेन्स (टीएल) सारख्या डेटिंग अर्थात कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. येथील पाण्यात असणाऱ्या शेवाळाचीही तपासणी केली जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या कोरल कॅल्शियम कार्बोनेटच्या मदतीने राम सेतूच्या काळाचा अंदाज लावला जाईल.
या संशोधनातून हजारो वर्षांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांवरून पडदा उठणार आहे. जसे, राम सेतू मानव निर्मित आहे की नैसर्गिक? सध्या राम सेतू जसा आहे, तो पूर्वीपासूनच तसाच आहे, की त्यात काही बदल झाला? राम सेतू किती पुरातन आहे? राम सेतू खरोखरच, ज्या काळात श्रीराम पृथ्वीवर होते, असे सांगितले जाते, त्याच काळातील आहे का?
याच बरोबच, या संशोधनामुळे राम सेतूचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, हेदेखील सरकारने स्पष्ट केले आहे. कारण राम सेतूसंदर्भातील ज्या प्रश्नांची उत्तरे आजही मिळू शकलेली नाहीत, त्यांचा शोध घेणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.
रामायनात उल्लेख आहे, की भगवान श्री रामचंद्रांनी पत्नी सीतेला रावनाच्या कैदेतून सोडविण्यासाठी श्रीलंकेवर स्वारी केली होती. यावेळी त्यांनी आपल्या वानर सहकाऱ्यांच्या मदतीने भारतातून लंकेत जाण्यासाठी समुद्रात सेतू बांधला होता. वानरांनी छोट्या-छोट्या दगडाच्या सहाय्याने हा पूल अथवा सेतू तयार केला होता. हा पूलच राम सेतू नावाने ओळखला जातो.