Ram Setu Bridge: भारत आणि श्रीलंकादरम्यान असलेल्या 'राम-सेतू'ला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे आणि त्याचे संरक्षण व्हावे, या मागणीवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांना आश्वासन दिले की, या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी केली जाईल.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेल्या 'सेतू समुद्रम' प्रकल्पांतर्गत जहाजांना जाण्यासाठी राम-सेतू पाडण्यात येणार होता. पण, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. तेव्हापासून राम-सेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.
काय आहे राम सेतू?
तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार यांच्यामध्ये असलेल्या चुनखडीच्या साखळीला राम-सेतू म्हणतात. भूगर्भशास्त्रज्ञ मानतात की पूर्वी ही साखळी पूर्णपणे समुद्राच्या वर होती. यावरून श्रीलंकेपर्यंत चालता येत असे. हिंदू धर्मानुसार, हा सेतू रामायण काळात भगवान रामाच्या सैन्याने बांधलेला पूल मानला जातो. जगातील अनेक देश याला मानवनिर्मित असल्याचे मानतात. अॅडम्स ब्रिज असेही म्हणतात.