लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने पुन्हा राम मंदिर बांधण्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर आणला आहे. मात्र राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल, अशीही जोड या वेळी देण्यात आली आहे. मुस्लिमांच्या तीनदा तलाकचा मुद्दाही भाजपाने उपस्थित केला आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्याला लोककल्याण संकल्पपत्र असे नाव देण्यात आले असून, त्यात घटनेच्या चौकटीत राहूनच राम मंदिर उभारण्याचा भाजपा प्रयत्न करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत अमित शहा म्हणाले की, मुस्लिमांमधील तीनदा तलाक म्हणून महिलेला घटस्फोट देण्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, मुस्लीम महिलांना होणारा त्रास टाळण्याचे प्रयत्न केंद्र सरकार निश्चितपणे करीत आहे. अर्थात राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुस्लीम महिलांचे म्हणणे ऐकूनच केंद्र सरकार आपली बाजू न्यायालयात मांडेल.भाजपा सत्तेवर आल्यानंतरच राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा विकास झाला, याचे उदाहरण त्यांनी या निमित्ताने दिले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी उत्तर प्रदेशला १५ वर्षे मागे नेते, असा आरोपही त्यांनी केला. सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ ४७ आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यात १२ जाहीर सभा घेणार आहेत. (वृत्तसंस्था)
भाजपाच्या अजेंड्यावर पुन्हा राम मंदिर
By admin | Published: January 29, 2017 4:57 AM