लखनऊ : कारसेवकांनी उद््ध्वस्त केलेल्या बाबरी मशिदीच्या जागी बांधायच्या राममंदिराच्या सुमारे ४० वर्षांपूर्वी तयार केलेल्या मूळ कच्च्या आराखड्यात फेरबदल करून हे मंदिर आधीच्या संकल्पचित्राहून अधिक भव्य व विस्तीर्ण स्वरूपात बांधण्यास राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंजुरी दिली असल्याचे सूत्रांकडून समजते. खरोखरच या सुधारित आराखड्यानुसार बांधकाम झाले तर जगातील ते तिसऱ्या क्रमांकाचे भव्य हिंदू मंदिर ठरेल.
अयोध्येत कारसेवकपूरम येथे संकल्पित मंदिराचा जो आराखडा ठेवलेला आहे तो राममंदिर आंदोलनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात विश्व हिंदू परिषदेने तयार करून घेतला होता. परंतु आता हे आंदोलन यशस्वी होऊन मंदिर प्रत्यक्षात साकारणार असल्याने तेअधिक भव्य व विस्तीर्ण बांधले जावे, अशी अपेक्षा संत-महंतांनी व्यक्त केली.