अयोध्या : अयोध्येत राम मंदिर बांधणीचे काम सुरू करण्याच्या तारखा पुढील वर्षीच्या प्रारंभी प्रयागराज येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा निर्मोही आखाड्याचे रामजी दास यांनी रविवारी केली. विश्व हिंदू परिषदेने येथे आयोजिलेल्या धर्मसभेत ते बोलत होते.
येथील बडे भक्तमाल की बगिया या ठिकाणी आयोजिलेल्या धर्मसभेचे वेदमंत्रांच्या जयघोषात उद््घाटन झाले. त्यानंतर रामजी दास यांनी आवाहन केले की, राम मंदिराच्या बांधणीचे काम सुरू होण्यास अगदी थोडे दिवस शिल्लक असून तोवर रामभक्तांनी संयम बाळगावा.या धर्मसभेला हजारो रामभक्त उपस्थित होते. या वेळी रामजन्मभूमी न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपालदास म्हणाले की, आम्ही न्यायालयाचा आदर करतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या बांधणीतले सारे अडथळे दूर करावेत. या वेळी धार्मिक नेते राम भद्राचार्य, चंपतराय आदींचीही भाषणे झाली.
विहिंपने आयोजित केलेली धर्मसभा व राम मंदिराच्या बांधणीचा मुद्दा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला दौरा या गोष्टी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला दिलेले खुले आव्हान आहे, अशी टीका आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी केली आहे. या संस्थेचे सरचिटणीस मौलाना वली रहेमानी यांनी म्हटले आहे की, विहिंप व उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमांमुळे मुस्लीमविरोधी वातावरण तयार होण्यास मदत झाली आहे.
मग आश्वासने का - उद्धव ठाकरेहिंदूंच्या भावनांशी खेळू नये. मंदिर बांधणीचे कामकाज सुरू व्हावे म्हणून गेल्या चार वर्षांत काय केले याचा हिशेब भाजपाने द्यावा. कोर्टात राम मंदिर प्रकरणी खटला सुरू आहे, मग भाजपाने मंदिर बांधणीसंदर्भात निवडणुकांमध्ये आश्वासने का दिली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचा शून्य सहभाग आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे.उद्धवजींना प्रभू रामांचे आशीर्वाद लाभू दे - देवेंद्र फडणवीसशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले, ही आनंदाची बाब आहे. उद्धवजींना प्रभू रामांचे आशीर्वाद लाभू दे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कºहाड (जि. सातारा) येथे व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला त्यांनी अभिवादन केले.