नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित केला आहेत. भूमिपूजन हे ज्योतिष शास्त्राच्या प्रस्थापित मान्यतेच्या विरूद्ध होत आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.दिग्विजय सिंह यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "आज अयोध्येत भगवान रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन वेदद्वारे स्थापित ज्योतिषाशास्त्राच्या प्रस्थापित मान्यतेच्या विरोधात आहे. परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर. हे बांधकाम सुरळीतपणे पूर्ण होऊ दे. ही आमची आपल्याला प्रार्थना आहे. जय सियाराम!"
यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यावेळी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. दिग्विजय सिंह म्हणाले होते, "अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? तुमची अशी काय अडचण आहे, की, तुम्ही हे सर्व होऊ देत आहात?”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत.
देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत ५ ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.