नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या तोडग्याचे सरकार स्वागतच करेल, तथापि सरकारने विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.रालोआ सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी येथे पत्रपरिषद बोलावली होती. सिंग हे रा. स्व. संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्हाला आता प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. राममंदिर हा न्यायालयाच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. आपल्याला न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. दोन समुदाय या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढू शकतात, असे सिंग यांनी म्हटले.राममंदिर आणि कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे) थंडबस्त्यात ठेवण्यात आले काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. गेल्या काही दशकांपासून तोडगा निघू न शकलेल्या या वादावर सध्या हिंदू आणि मुस्लिम समुदायात कोणतीही चर्चा सुरू नाही. मधला मार्गही दृष्टिपथात नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कलम ३७० सारख्या मुद्यावर सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केल्याबद्दल विचारण्यात आले असता राजनाथसिंग यांनी मुद्याला बगल दिली. ‘अभी अभी तो सरकार बनी है’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.
राममंदिर महत्त्वाचे; मात्र विकासावर लक्ष
By admin | Published: May 30, 2015 12:08 AM